खंडगाव हमीद येथे ‘मैत्रेय ध्यान साधना केंद्र’चे आज भव्य उद्घाटन.


नांदेड जिल्हा प्रतिनिधी : सूर्यकांत वाघमारे बारूळकर 

त्रिरत्न मानव विकास प्रतिष्ठान, ता. मुखेड यांच्या वतीने संचलित मैत्रेय ध्यान साधना केंद्र, खंडगाव (हमीद) येथे शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य उद्घाटन सोहळा व धम्मसहाय्यकांचा “धम्ममित्र समारंभ” उत्साहात पार पडणार आहे. या कार्यक्रमामुळे परिसरात आध्यात्मिक, सामाजिक आणि बौद्धिक चळवळीला नवे बळ मिळणार आहे.

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीच्या संकल्पनेतून या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. प्रतिष्ठानच्या वतीने मानवतावादी कार्य आणि धम्मदाय निर्मितीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने व दात्यांच्या योगदानातून केंद्राची उभारणी पूर्ण झाली आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन आयु. दशरथ रावजी लोहबंदे (मा. जि. प. स. नांदेड) यांच्या हस्ते सकाळी १०:३० वाजता होणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून धम्मचारी पद्मगर्भ (चेअरमन, त्रिरत्न बौद्ध महासंघ केंद्र, नांदेड) उपस्थित राहणार आहेत. तसेच आयु. डी. जी. चंदन फुले, आयु. व्यंकटराव लोहबंदे , आयु. गौतमजी काळे, आयु. अनिल शिरसे , आयु. उत्तमराव बनसोडे, आयु. राजू घोडके, आयु. किशनराव वन्नाळे , आयु. डॉ. एल. एस. वाघमारे, आयु. सदाशिवराव बनसोडे, आयु. मोहनराव कांबळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

दुपारी १ वाजता दुसरे सत्र पार पडणार असून स्मृतिशेष शंकरराव जवलाजी बनसोडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बारखेड यांच्या वतीने भोजनदानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता “धम्मसहाय्यकांचा धम्ममित्र समारंभ” सोहळा होणार असून धम्मचारी अचलरत्न मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळी १०:३० ते दुपारी ४:०० या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी परिसरातील बौद्ध बांधव, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन धम्मचारी आनंदगर्भ (चेअरमन), धम्मचारी पुण्यसेन (सचिव) व धम्मचारी पुण्यादित्य (मित्र संचालक) यांनी केले आहे.

मैत्रेय ध्यान साधना केंद्राच्या स्थापनेमुळे खंडगाव परिसरात ध्यान, प्रबोधन आणि सामाजिक बांधिलकीची नवी दिशा मिळणार असून, हा उपक्रम समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!