
ठाणे प्रतिनिधी | माया खिल्लारे
भारतीय इतिहासात 2 मार्च 1930 हा दिवस केवळ तारीख नाही, तर तो हजारो वर्षांच्या गुलामगिरीविरुद्धचा निर्भीड जाहीरनामा आहे.
याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरासमोर सुरू झालेल्या सत्याग्रहाने जातिव्यवस्थेच्या मुळावर घाव घातला.
हा लढा देवाच्या दर्शनासाठी नव्हता, तर माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारासाठीचा होता. *“देव सर्वांचा आहे” – क्रांतिकारक घोषणा*
समाजाच्या एका घटकाला देवापासून, मंदिरापासून आणि माणुसकीपासून दूर ठेवणाऱ्या व्यवस्थेविरोधात बाबासाहेबांनी ठामपणे सांगितले –
“जर देव अस्पृश्यतेला मान्यता देत असेल, तर असा देव आम्हाला नको!”
या शब्दांनी संपूर्ण देश ढवळून निघाला.
सहा वर्षांचा अभेद्य संघर्ष

2 मार्च 1930 रोजी हजारो वंचित बांधवांनी नाशिकमधील काळाराम मंदिर समोर शांततामय मार्गाने सत्याग्रह सुरू केला.
हा संघर्ष 1935 पर्यंत चालला.
मारहाण, बहिष्कार, धमक्या, उपासमार — सर्व सहन करूनही सत्याग्रहींनी माघार घेतली नाही.
हा इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चाललेला मंदिर प्रवेश सत्याग्रह ठरला.
*धर्माच्या नावावर अन्यायाला नकार*
काळाराम सत्याग्रहाने स्पष्ट संदेश दिला —
धर्म जर माणसाला माणूस म्हणून स्वीकारत नसेल, तर त्या धर्माचा पुनर्विचार झाला पाहिजे.
याच संघर्षातून पुढे बाबासाहेबांचा धर्मांतराचा विचार, संविधानातील समानतेचे तत्त्व आणि सामाजिक न्यायाची पायाभरणी झाली.
आजच्या पिढीसाठी संदेश
आजही जातीवाद संपलेला नाही.
म्हणूनच 2 मार्च हा दिवस फक्त स्मरणाचा नव्हे, तर आत्मपरीक्षणाचा आहे.
काळाराम मंदिर सत्याग्रह आपल्याला शिकवतो.
*“हक्क मागून नाही, संघर्षातून मिळतात!”*
अभिवादन
समतेसाठी लढलेल्या सर्व सत्याग्रहींना
आणि क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी अभिवादन.