
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:सूर्यकांत वाघमारे बारूळकर
समाजसेवेचा नवा अध्याय; पत्रकार अशोक तेलंग आणि सुर्यकांत पैनापल्ले यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तनाचा संकल्प
हातभार सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वाटचालीत आजचा दिवस नव्या आशा, नव्या उर्जेचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या दृढ संकल्पाचा साक्षीदार ठरला. सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व एकमताने प्रभावी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, चालू वर्षात प्रतिष्ठान अधिक जोमाने, अधिक व्यापक आणि अधिक परिणामकारक सामाजिक कार्य करणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार अशोक तेलंग यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. समाजातील प्रश्नांवर निर्भीडपणे लेखणी चालवणारा आवाज आता प्रत्यक्ष कृतीतून समाजासाठी उभा राहणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठान सेवेचा नवा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
उपाध्यक्षपदी पत्रकार पांडुरंग सूर्यवंशी सर,
सचिवपदी पत्रकार सूर्यकांत पैनापल्ले सर,
सहसचिवपदी सौ. अर्चना अशोक तेलंग,
कार्याध्यक्षपदी सचिन श्रीराम सर,
प्रसिद्धीप्रमुखपदी मस्तान पिंजारी सर,
खजिनदारपदी माणिक शंकरराव पवार सर,
कोषाध्यक्षपदी कैलास व्यंकटेश दूधकावडे,
युवा प्रतिनिधी म्हणून अतुल किनवाड,
तर महिला प्रतिनिधी म्हणून विद्या सूर्यकांत पैनापल्ले यांची निवड सर्वांच्या ठरावाने करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीतील प्रत्येक पदाधिकारी हा केवळ पदाचा मान न मानता, जबाबदारीचा सन्मान म्हणून काम करेल, अशी ठाम ग्वाही देण्यात आली. “समाज बदलायचा असेल तर फक्त बोलून नाही, तर प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करावे लागते,” ही भूमिका सर्वांनी एकमुखाने मांडली.
हातभार सामाजिक प्रतिष्ठानचे उद्दिष्ट होटकरू, गरजू व वंचित घटकांना सक्षम करणे, पर्यावरणाविषयी आपुलकी निर्माण करून जनजागृती करणे, तसेच नावाप्रमाणेच समाजातील प्रत्येक घटकाने एक ‘हातभार’ लावावा, ही प्रेरणा रुजवणे हे आहे.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून प्रतिष्ठान सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय, आरोग्य व जनजागृतीच्या उपक्रमांना अधिक व्यापक रूप देणार असून, “सेवा हीच साधना” या भावनेतून महाराष्ट्रभर प्रभावी कार्य उभे राहील, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.