जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव
ता.जि. जालना : बाजीउम्रद गावामध्ये आज सकाळी सुमारास ६ वाजता घडलेल्या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील शेतकरी कृष्णा पडूळ यांच्या गाईचे वासरू घराशेजारील गोठ्यामागील बाजूस बांधलेले असताना बिबट्याने अचानक हल्ला करून वासरू उचलून नेले व ठार केले.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी एकत्र येत परिसराची पाहणी केली. वासरूचे अवशेष जवळच्या शेतात आढळून आले. या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे.
ग्रामस्थांनी वनविभागाला तातडीने कळवून पथकाला घटनास्थळी येण्याची मागणी केली आहे. बिबट्या मानववस्तीच्या इतक्या जवळ येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

वनविभागाकडून पंचनामा करून योग्य ती कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
