उल्हासनगर प्रतिनिधी : प्रदीप जाधव
उल्हासनगर : नीलकंठ नगर येथे नगरसेविका कीर्ती ताई ढोणे व समाजसेवक शुभम ढोणे यांच्या पुढाकाराने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात नागरिकांना सुरक्षिततेबाबत तसेच सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. प्रशांत खरात, पोलीस हवालदार सोनवणे आणि पोलीस हवालदार खांबेकर उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत खरात यांनी नागरिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. घर भाड्याने देताना किंवा भाड्याने घेताना संबंधित पोलीस ठाण्याला आवश्यक माहिती द्यावी.

तसेच अनोळखी क्रमांकावरून येणारे संशयास्पद फोन उचलताना सावधगिरी बाळगावी. व्हॉट्सॲपवर आलेल्या अनोळखी APK फाइल्स डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नयेत आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँकेचे तपशील, ओटीपी किंवा गोपनीय माहिती देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद फोन, मेसेज किंवा लिंकवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.

या जनजागृती कार्यक्रमामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असून पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.
