जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या बंदला कंधारची साथ


कंधार कडकडीत बंद; जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा, तहसीलदारांना निवेदन

कंधार | प्रतिनिधी: धम्मानंद कांबळे 

कंधार | दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या हाकेला प्रतिसाद देत गुरुवार (दि. २३ जुलै २०२६) रोजी कंधार शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला विविध सामाजिक संघटना, सर्व राजकीय पक्ष, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, शाळा-महाविद्यालये, विविध आस्थापना तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह बहुतांश दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने, हॉटेल्स, शैक्षणिक संस्था व इतर व्यावसायिक आस्थापना दिवसभर बंद राहिल्या. संपूर्ण शहरात दिवसभर शुकशुकाटाचे चित्र पाहावयास मिळाले.

बंदच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने शहरातून शांततेत निषेध मोर्चा काढण्यात आला.

मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मोर्चामध्ये अॅड. वंचित बहुजन आघाडी च्या महिला कंधार तालुका अध्यक्षा साधना एंगडे, प्रा.पुरुषोत्तम धोंडगे, शिवसेना (उबाठा गट ), संजय भोसीकर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष, ओबीसी नेते रामचंद्र येईलवाड ,दिलीप देशमुख नगरसेवक वंचित बहुजन आघाडी, गणेश कुंटेवार, मा. नगरसेवक, पंडित देवकांबळे, माजी.उपसभापती पं. समिती कंधार, प्र., नितीन पा. कोकाटे, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष, परमेश्वर पा. जाधव, शिवसेना (उबाठा गट ) तालुकाप्रमुख, एन डी दाभाडे, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष, दिलीपदादा जोंधळे, मनोज जमदाडे,मयुर कांबळे, अविनाश कांबळे,रमाताई कठारे, सोनियाताई पारडे, भाग्यश्री गायकवाड, आनंदराव कांबळे,जितेंद्र ढवळे, बी. सी. कांबळे, माधव कांबळे, माणिक ढवळे, मोहसीन बागवान, गंगासागर दिग्रसकर, सय्यद मोसिन शेख मोईन, सुरेश कल्लाळीकर, सलीम भाई, म. हमीद सुलेमान, अजय मोरे सतीश नळगे, साईनाथ मळगे, अनिल सूर्यवंशी,अहमद पठाण, रुपेश कांबळे, भास्कर कदम, सुनील कांबळे, विकी कंधारकर, अभिजीत कंधारकर, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, यांच्यासह विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

तहसीलदारांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे आणि प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.

मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील जुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद घोडके यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पोलीस प्रशासनाच्या दक्षतेमुळे मोर्चा शांततेत, शिस्तबद्ध व कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडला.

कंधार बंदला शहरातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, शाळा-महाविद्यालये, विविध सामाजिक संघटना, सर्व राजकीय पक्ष तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्याने दिवसभर शहरातील व्यवहार ठप्प राहिले. शांततेच्या मार्गाने कंधारकरांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत एकजुटीचा संदेश दिल्याचे चित्र संपूर्ण शहरात पाहावयास मिळाले.


Leave a Comment

error: Content is protected !!