
पुणे :
महायुती सरकार आणि एस.आर.ए. (SRA) च्या भ्रष्ट, भोंगळ व बिल्डरधार्जीण्या कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विराट धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
हा मोर्चा सोमवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी येथून निघून एस.आर.ए. कार्यालय, पुणे येथे धडकणार आहे.
या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर करणार असून, मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहणार आहेत.
एस.आर.ए. योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य झोपडपट्टीधारकांना न्याय न मिळता बिल्डर वर्गाला लाभ मिळत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचारविरोधात, झोपडपट्टीधारकांच्या हक्कांसाठी आणि पारदर्शक प्रशासनाच्या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
या मोर्चामुळे पुणे परिसरात मोठी जनचळवळ उसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.