कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव
डोंबिवली, दि. 13 ऑक्टोबर 2025 — विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमानकारक वादग्रस्त विधान करणाऱ्या अनिल मिश्रा या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा ग्वाल्हेर येथे वर्ग न करता कल्याण-डोंबिवली येथेच तपास व कार्यवाही करण्यात यावी, अशी ठाम मागणी रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) तर्फे करण्यात आली आहे.
या संदर्भात ठाणे प्रदेश उपाध्यक्ष मा. माणिकराव उघडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली रवि गायकवाड, हरिश्चन्द्र कांबळे, पिराजी काकडे,अशोक हिवाळे,प्रमिला सावंत, माया मोरे, सुनीता खरात, भारतीबाई हिवाळे,मीनाताई साळवे,प्रमिला वाहुळे,रेखा खरे अनेक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन डोंबिवली येथील रामनगर पोलीस ठाण्याचे एसीपी हेमाडे साहेब यांना निवेदन सादर केले.
कार्यकर्त्यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी अपमानकारक भाषा वापरणे हे समाजाच्या भावना दुखावणारे कृत्य आहे. त्यामुळे संबंधित आरोपीवर तत्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी.”
या वेळी रिपाई आठवले गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.