३३ तास, हजारो प्रवासी आणि शून्य सुविधा; हेच का तुमचे विकसित प्रशासन? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल


पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकर उलटल्यामुळे झालेल्या ३३ तासांच्या भीषण वाहतूक कोंडीवरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. केवळ एका टँकर गळतीमुळे संपूर्ण एक्सप्रेसवे ३३ तास ठप्प होणे, हे आपल्या ‘विकसित’ प्रशासनाचे लक्षण आहे का? असा सवाल त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.

प्रशासकीय सज्जतेवर प्रश्नचिन्ह –

एक्सप्रेस वेवर उलटलेल्या टँकरमधील ज्वलनशील ‘प्रोपेलिन गॅस’ सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये हलवण्यासाठी NDRF, SDRF, BPCL आणि महामार्ग पोलिसांना तब्बल ३३ तास लागले. या विलंबावर बोट ठेवत आंबेडकर म्हणाले की, प्रशासन किती लोकधार्जिणे आणि कार्यक्षम आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. इतका वेळ लागणे हे प्रशासकीय समन्वयाचा अभाव स्पष्ट करते.

प्रवाशांचे हाल आणि टोल वसुलीचा संताप –

या ३३ तासांच्या काळात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालके अन्न-पाण्यावाचून महामार्गावर अडकून पडली होती. या परिस्थितीवर संताप व्यक्त करताना त्यांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले. ते म्हणाले, हजारो प्रवासी अडकलेले असताना त्यांना साध्या स्वच्छतागृहाच्या सुविधाही उपलब्ध नव्हत्या. रस्ता पुढे बंद असतानाही वाहनांना एक्सप्रेस वेवर प्रवेश का दिला गेला? ही प्रशासनाची मोठी चूक आहे.

एकीकडे रस्ता ठप्प असताना दुसरीकडे टोल वसुली मात्र निर्धोकपणे सुरू होती, यावरून त्यांनी प्रशासनाच्या संवेदनशून्यतेवर प्रश्न उपस्थित केले. मुंबई आणि पुण्यातील नुकत्याच निवडून आलेल्या किती लोकप्रतिनिधींनी या संकटकाळात अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी धाव घेतली? असा सवाल करत त्यांनी राजकीय नेत्यांच्या उदासीनतेवरही हल्ला चढवला.

३३ तास नागरिक रस्त्यावर अडकून पडणे ही केवळ तांत्रिक अडचण नसून ती एक गंभीर प्रशासकीय चूक असल्याचे सांगत, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!