‘वंचित’चा दणका: विष्णुपूरी ग्रामीण पॉलीटेक्निकमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार, १५ दिवसांत फी परताव्याचे आश्वासन


नांदेड : नांदेड दक्षिण येथील विष्णुपुरी ग्रामीण पॉलीटेक्निक कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे प्रश्न पंधरा ते वीस दिवसांत निकाली काढून त्यांची शैक्षणिक फी परत करण्याचे लेखी आश्वासन महाविद्यालय प्रशासनाने दिले आहे.

 

ग्रामीण पॉलीटेक्निक कॉलेज, विष्णुपुरी येथील BMLT व BMIT या अभ्यासक्रमांच्या २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अद्याप नोंदणी क्रमांक मिळालेला नाही. यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक नुकसान झाले असल्याची तक्रार आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय पवार यांना जाब विचारण्यात आला. यावेळी प्रश्न तत्काळ सोडवला नाही तर या प्रकरणात बाळासाहेब आंबेडकर यांची मदत घेण्याचा इशाराही देण्यात आला. या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, वंचित बहुजन आघाडी नेहमीच मदतीला धावून येते, असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिण जिल्हा महासचिव रवि पंडित, महानगर युवा अध्यक्ष सुखा सिंग टाक महाराज, युवा नेते शुद्धोधन कापसीकर, युवा जिल्हाउपाध्यक्ष राज बुध्दे, सम्राट आढाव, प्रा. राजेश ढवळे, विठ्ठल, अतुल मांजरमकर, पंढरी ठाकुर, स्वप्निल बुध्दे, नागेश वडवळे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!