
प्रतिनिधी : प्रकाश गवारे
मुदखेड दि. 23 जुलै 2026
नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज व अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ तसेच आंदोलनरत विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त वतीने आज, दि. 23 जुलै 2026 रोजी पुकारण्यात आलेल्या ‘मुदखेड बंद’ ला शहरातील व्यापारी, व्यावसायिक, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे शहरातील बंद पूर्णतः यशस्वी ठरला.
सकाळपासूनच मुदखेड शहरातील मुख्य बाजारपेठ, किरकोळ दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने तसेच विविध आस्थापना स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आल्या. संपूर्ण शहरात शांततेच्या वातावरणात बंद पाळण्यात आला. व्यापारी वर्गाने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देत स्वखुशीने व्यवसाय बंद ठेवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थी हे देशाचे वर्तमान आणि भविष्य आहेत. लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून अशा आंदोलनावर बळाचा वापर होणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज व अमानुष मारहाणीची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बंददरम्यान विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरात फिरून व्यापारी व नागरिकांशी संवाद साधला. या आंदोलनाचा उद्देश विद्यार्थ्यांवरील अन्यायाचा निषेध करणे आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. व्यापारी वर्गानेही या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला आपला जाहीर पाठिंबा दिला.
बंदच्या काळात शहरात शांतता कायम राहिली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली होती. कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याने बंद शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडी, मुदखेड यांच्या वतीने बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या सर्व व्यापारी, व्यावसायिक, सामाजिक संघटना, नागरिक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधातील लढा संविधानिक व लोकशाही मार्गाने पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.