
कल्याण प्रतिनिधी
उल्हासनगर महानगरपालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा शांतीनगर स्मशानभूमी परिसरात बसवल्यामुळे शहरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्ते राज असरोंडकर, ‘कायद्याने वागा लोक चळवळ’चे नेते, यांनी उपोषण सुरू केले असून आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.

आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि महान समाजसुधारक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची स्मशानभूमीत स्थापना करणे हे अत्यंत अयोग्य आणि अवमानकारक आहे. त्यामुळे हा पुतळा तात्काळ त्या ठिकाणाहून हटवून योग्य सार्वजनिक ठिकाणी बसवावा, अशी त्यांची मागणी आहे.
राज असरोंडकर यांच्या उपोषणाला आता विविध संघटनांचा पाठिंबा मिळू लागला आहे. असंघटित कष्टकरी कामगार संघटनेनेही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून, लवकरात लवकर प्रशासनाने यावर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असून प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे पुढील काळात हे आंदोलन आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




