श्री महादेव लिंग व नंदी प्राणप्रतिष्ठा निमित्त बारूळ येथे शिवपुराण कथेचे आज पासून सुरुवात 


 नांदेड जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारूळकर.

 

 शेकडो वर्षापासून बारूळ येथे पूजिले जाणारे आणि भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या बारूळ येथील जागृत देवस्थान सिंहासनावरील श्री महादेव लिंगाची पुनर्रप्राणप्रतिष्ठा व भव्य दिव्य नंदीच्या लोकार्पणाचा पावन सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे. गावाच्या कानाकोपऱ्यात हर हर महादेवच्या जयघोषात श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा अनुपम संगम अनुभवायला मिळणार आहे.

या दिव्य सोहळ्यास गुरुवाचार्य श्री ष.ब्र.प्र. १०८ डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, गणाचार्य मठ संस्थान मुखेड, श्री १०८ प.पु. महंत बबन महाराज कोलंबीकर, दत्त मठ संस्थान कोलंबी (नायगाव) तसेच प.पु. संत श्री नामदेव महाराज बारूळकर,

 

मठ संस्थान बारूळ यांची पावन उपस्थिती लाभणार असून त्यांच्या सान्निध्यात वैदिक विद्वानांच्या मंत्रघोषात धार्मिक विधी पार पडणार आहेत.

 

या सोहळ्याच्या निमित्ताने दि. ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत शिवपुराणचार्य ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांच्या अमृतमय बाणीतील शिवपुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. शिवभक्तांसाठी ही कथा आत्मिक समाधान व अध्यात्मिक उन्नती देणारी ठरणार आहे.

 

दि.६ फेब्रुवारी रोजी होम-हवन, श्री महादेव लिंगाची विधीवत पुनर्रप्राणप्रतिष्ठा तसेच भव्य दिव्य नंदीचा लोकार्पण सोहळा गुरुवर्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या पावन प्रसंगानंतर समस्त ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविकांसाठी सार्वजनिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, बारूळ गावाच्या श्रद्धा, एकजूट आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव आहे. या ऐतिहासिक व भक्तीमय सोहळ्याचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन महादेव मंदिर संस्थान व समस्त ग्रामस्थ मंडळ, बारूळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!