
कल्याण प्रतिनिधी:प्रदीप जाधव
उल्हासनगर – नागसेन बुक डेपो, सोमनाथ भोसले कल्याण यांच्या वतीने “धम्मपद गाथा आणि कथा घराघरात अभियान” अंतर्गत धम्मदिक्षा ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘धम्मपद महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. रविवार, २६ ऑक्टोबर २०२५ रोजी महास्थविर चंद्रमणी बुद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, उल्हासनगर येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या महोत्सवाचा मुख्य विषय ‘धम्मपद आणि मानवी जीवन’ हा होता. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक सुभाष सुमन प्रभाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून बौद्ध साहित्यिक आणि ‘धम्मपद गाथा आणि कथा’ पुस्तकाचे भावानुवादक डी. एल. कांबळे साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिवे, कवठेमहांकाळ (सांगली) यांचा ‘काव्यमय संवाद’ आणि ‘आम्ही भारताचे लोक’ ही कवितांची दंगल होती. तसेच, युगक्रांती सांस्कृतिक युवा मंचने ‘शाहिरी जलसा’ आकाश आणि ऐश्वर्या यांनी सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली. मान्यवरांच्या हस्ते लकी ड्रॉ काढून पाच आकर्षक बुद्ध मूर्तींचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.